संस्थेचे ध्येय :

सभासदांच्या गरजेच्या कालावधित कर्जाच्या माध्यमांतून वित्तपुरवठा करुन त्यांना आर्थिक सहाय्य प्राप्त व्हावे व सभासद हित साधावे हेच प्रथम उद्दीष्ट समोर ठेवून संचालक मंडळ सतत कार्य करीत असते. सन्माननीय सभासदां करीता विविध योजना राबवून त्यांचा गुणगौरव तसेच आर्थिक उन्नती व सन्मान याकरीता सतत अभ्यास व पाठपूरावा करुन कार्य करत राहाणे व आपल्या या कामधेनू संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने नेऊयात असा संकल्प आपण सर्व संचालक व सभासद मिळून करुयात.

संस्थेचा इतिहास -

वर्ष १९२४ साली अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेची स्थापना. सभासदांच्या आर्थिक गरजा आणि परस्पर सहकार्य या उद्देशाने संस्थेची स्थापना होऊन मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रारंभीच्या काळात न्यायालायीन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात संस्थेने वाटचाल सुरु केली. त्या काळात मा. जिल्हा न्यायाधीश हे पदसिद्ध अध्यक्ष असत व बहुतेक वेळा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकडे होते.

वर्ष १९९०-९५ नंतर खऱ्या अर्थाने सभासदांच्या सहभागाचे पर्व सुरु झाले. पोटनियमांमध्ये बदल करून संचालक मंडळातील सदस्यांमधून चेअरमन निवडण्याची लोकशाही पद्धत सुरू झाली. तसेच संस्थेच्या त्या काळातील कर्तव्यनिष्ठ सेवकांचेसुद्धा योगदान झालेले दीसून येते. अल्प मानधनावर सचिव म्हणून काम करणाऱ्या इ. आर. मानकर, एम. ए. दसरे, पी. एल. कुलकर्णी, अवसरे, होनराव, राठोड आदींचे योगदान लक्षात राहणारे आहे.
चेअरमन श्री. अविनाश रामचंद्र कचरे


वर्ष १९८०-८१ साली कै. बी. एन. दुसावाड यांच्या विशेष परिश्रमातून इंग्रजी पोटनियमांचे मराठी भाषांतर करुन तसे पुस्तकाचे प्रकाशन केले गेले. त्या काळात साधे कर्ज फक्त रु.३,६००/- आणि तातडीचे कर्ज रु.१००/- होते. छोट्या कर्जातून मोठ्या स्वप्नांकडे पहात आज आर्थिक क्षमता वाढून मासिक वर्गणी, कर्जमर्यादा वाढत गेली त्यामुळे सभासदांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढली. संस्थेच्या सातत्याने पाळलेल्या आर्थिक शिस्तीमुळे दरवर्षी 'अ' ऑडिट वर्ग मिळविण्याची गौरवशाली परंपरा सुरू झाली . बँकेच्या कॅश क्रेडिटचा आधार न घेता, सभासदांच्या स्वभांडवलाच्या बळावर उभी राहिलेल्या आपल्या या संस्थेने स्वावलंबनाची खरी ताकद अधोरेखित केली.

सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी सभासदांच्या हिताचा सतत पाठपूरावा करत दिवाळीपूर्वी शेअर्सवर सुमारे १३% डिव्हिडंड आणि ठेवींवर ८% व्याज देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

संस्थेने स्वत:चा न्यायालयाजवळ फ्लॅट खरेदी करुन संस्थेच्या स्वतंत्र अस्तित्वाचा, स्वत:च्या वास्तूचा भविष्यातील विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला.

एका छोट्याशा संकल्पातून सन १९२४ मध्ये लावलेले सहकाराचे हे रोपटे आज शतकभराच्या अनुभवाने वटवृक्ष झाले आहे.

अनेक पदाधिकाऱ्यांचे योगदान, असंख्य सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांची मेहनत यामुळे ही संस्था आज दिमाखात आपल्या समोर उभी आहे.

काळ बदलला, कर्जमर्यादा बदलल्या, तंत्रज्ञान बदलले; मात्र एक गोष्ट बदलली नाही — ती म्हणजे "सभासदांच्या हितासाठी काम करण्याची संस्थेची निष्ठा”

** “शतकभराचा विश्वास... सहकारातून समृद्धीकडे!” **

धन्यवाद!....

चेअरमन
श्री. अविनाश रामचंद्र कचरे